चार वाहनांचा विचित्र अपघात;दोन जखमी, वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार चौकाजवळील घटना

Foto

वाळूज: दोन ट्रक, छोटा हत्ती आणि एक दुचाकी अशा चार वाहनांचा विचित्र अपघात आज सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहतीत जाणार्‍या मुख्य रस्त्यावर कामगार चौकाजवळ राठी ट्रेनिंग कंपनीसमोर घडला. यामध्ये दोघेजण किरकोळ जखमी झाले. 

 गुुरुवारी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास तिसगाव येथील सूर्यवंशीनगरातील रहिवासी रामभाऊ साळवे हा पाणी वाहतूक करणारा टँकर (क्र. एम.एच.43/वाय. 7953) घेऊन कामगार चौकाकडून औद्योगिक क्षेत्रात जात होता. राठी ट्रेडिंग कंपनी चौकात छोटा हत्ती (क्र.एम.एच.20/सी.टी. 3153) चा चालक किशोर सोनवणे (रा. विठ्ठल-रुख्मिणी मंदिरजवळ, पंढरपूर) हा अचानक वळण घेत असताना समोरील लोखंडी पत्र्याच्या पेटी घेऊन जाणार्‍या श्री न्यू विश्‍वास ट्रान्सपोर्टचा ट्रक (क्र.एम.एच.04/ई.बी. 2836) चा चालक अल्ताफ पठाण (रा. उत्तर प्रदेश) याने अचानक ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान पाणी टँकर, ट्रक, छोटा हत्ती आणि स्कुटी (क्र.एम. एच.20/सी. डब्ल्यू. 4705) अशा चार वाहनांचा विचित्र अपघात घडला. या अपघातात टँकरचालक रामभाऊ साळवे व स्कुटीस्वार प्रवीण तुकाराम हारदे हे दोघे किरकोळ जखमी झाले. या अपघातामुळे वाहनांच्या रांगा लागल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या विचित्र अपघाताची माहिती मिळताच वाळूज वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत राठोड, पोहेकाँ रामेश्‍वर कवडे, संतोष मादनकर, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आर. डी. वडगावकर, अशोक दाभाडे, पोहेकाँ काकासाहेब जगदाळे, भीमराव शेवगे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन, अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली.